तुम्ही जर राज्यशास्त्राचे विद्यार्थी/अभ्यासक असाल, किंवा तुम्हाला जर राजकारणात रूची असेल, तुम्ही जर स्वत:ला राजकारण/समाजकारणात झोकून दिलं असेल, किंवा तुम्हाला समाजसुधारणेच्या ध्येयानी पछाडलेले असेल, किंवा तुम्हाला जर राजकीय घडामोडी आणि त्याच्या पडसादांबद्दल जाणून घेण्यात रस असेल, तर वाचलंच पाहिजे असं पुस्तक म्हणजे ग.प्र. प्रधान लिखीत ‘साता उत्तराची कहाणी’.
ध्येयानी प्रेरलेले सात तरूण. स्वातंत्र्योत्तर काळात या देशाच्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक जीवनाला लागलेले ग्रहण सुटावे म्हणून आपल्याला पटलेल्या मार्गाने वाटचाल करणारे. त्या वाटेतील वैचारिक आणि भावनिक संघर्षांना धीराने सामोरे जाणारे. त्यांच्या ध्येयजीवनाची ही कहाणी. खरंतर त्यांच्या आणि त्यांच्या नंतरच्या पिढ्यांचीच ही प्रातिनिधिक कहाणी! ह्या कथानकाच्या माध्यमातून ग.प्र स्वातंत्र्योत्तर काळातील भारताच्या वाटचालीचं पटलच उलगडून दाखवतात. समाजवादी, मार्क्सवादी, रॉयिस्ट, फुले-आंबेडकरवादी, हिंदुत्ववादी, गांधीवादी अशा विविध विचारसरणीचं प्रतिनिधित्व करणारे हे सात तरूण. ‘चले जाव’ चळवळीपासून सुरू झालेलं हे कथानक जयप्रकाश नारायणांच्या मृत्यूपर्यंतच्या (१९७९) चार दशकांचं चित्रण आपल्यासमोर मांडतं. ह्या कालखंडातील मुख्य घडामोडी, त्या घटनांचे भारतीय समाजावरील परिणाम, राजकीय पक्षांची त्या घडामोडींसंदर्भातील भूमिका, पक्षनेतृत्वाने घेतलेल्या काही निर्णयांमुळे निष्ठावान पक्ष कार्यकर्त्यांची झालेली ओढाताण आणि माजलेला भावनिक हलकल्लोळ, भारतीयांच्या मनात उमटलेले पडसाद आणि पक्षीय राजकारणाला लागलेले नवे वळण अशा सर्व गोष्टी ह्या तरूणांच्या पत्रव्यवहारातून आपल्या समोर येतात.
राज्यशास्त्राची विद्यार्थिनी असल्याने ह्या सर्व घटना, राजकीय पक्षांची भूमिका, विविध विचारसरणी - त्यांच्यातल्या त्रुटी ह्यांविषयी तसं मला माहित आहे. पण ह्याच सर्वांकडे गोष्टीच्या माध्यमातून- विविध व्यक्तींच्या (थोडक्यात, विचारसरणींच्या) दॄष्टीकोनातून पाहताना मला आणखी मजा आली! इथे विशेष नोंद अशी करावी वाटते, की हे सर्व लिहिताना कुठेही प्रधानांची स्वत:ची विचारसरणी झळकली आहे, किंवा कोणा एका विचारसरणीवरच जास्त लक्ष केंद्रीत झालं आहे असं मुळीच होत नाही. अतिशय तटस्थपणे ग.प्रंनी सर्व बाजू आणि सर्व विचारप्रवाह टिपले आहेत.
केवळ ह्याच सात तरूणांमधले वैचारिक संघर्ष नव्हेत, तर त्यांचे आणि त्यांच्या मुलांचे थोडक्यात, दोन पिढ्यांचे होणारे संघर्षही ही कहाणी मांडते. त्यांच्या वैचारिक आणि राजकीय संघर्षासोबतच त्या वाटेतले भावनिक हिंदोळेही आपल्या समोर येतात. मार्क्सवादी असलेल्या वैद्यच्या मुलाचे शिवसेनेत जाणे, रॉयिस्ट असलेल्या एम.आर च्या मु्लाने नक्षलवादाचा मार्ग स्विकारणे, दोघेही गांधीवादीच असले तरी वडीलांचा सर्वोदयाचा मार्ग डावलून सामंतच्या मुलाने जयप्रकाशांच्या राजकीय चळवळींचा मार्ग निवडणे, ह्या सर्वातून ग.प्र नव्या आणि जुन्या पिढीतील वैचारिक आणि त्यातून निर्माण होणा-या भावनिक संघर्षावर बोट ठेवतात.
कोणत्याही समाजकारण वा राजकारणाला झोकून दिलेल्या ध्येयवादी व्यक्तीचा प्रवास तिच्या सहचर वा सहचारिणीच्या समर्थ साथीशिवाय यशस्वी होऊ शकत नाही. ती व्यक्तीही तितकीच ध्येयानी प्रेरलेली, सोबत्याच्या ध्येयाला समजून घेणारी, त्याच्या संघर्षात समजून उमजून साथ देणारी असावी लागते. ही कहाणी त्या सर्व साथीदारांचीही तितकीच आहे जितकी ती ह्या सात तरूणांची आहे. वसंतासारखीच मार्क्सवादी पक्षाची सदस्य असूनही त्याला पार्टीवर्क करता यावं म्हणून ताराने संसार चालवण्याची, पर्यायाने नोकरी करण्याची जबाबदारी स्वीकारणं, कालांतराने "पार्टीत सतत राजकीय विषय आणि चर्चा हेच चालू असतं" म्हणत वैद्यने तारासोबत आधीसारखी राजकीय चर्चा करायला दिलेला नकार, त्यातून ताराची होणारी घुसमट, सतत दौ-यावर असणा-या ह्या पक्ष कार्यकर्त्यांच्या सहचारिणींनी एकहाती संसार सांभाळणं इत्यादी छोट्या छोट्या घटनांच्या उल्लेखांतून राजकीय-सामाजिक कार्यकर्त्यांच्या सांसारिक आणि भावनिक अडचणीही आपल्यासमोर मांडल्या जातात.
किंबहुना त्यामुळेच ही केवळ राजकीय विचारसरणी वा वैचारिक संघर्षाची कहाणी रहात नाही. ह्या पुस्तकातील एका पात्राने म्हणल्याप्रमाणे, ही त्या सर्व वेड्या, ध्येयवादी व्यक्तींची कहाणी आहे; जी व्यावहारिक अर्थाने सुफळ नसेल, अपूर्णही असेल पण तरीही त्या कहाणीत आपलं मन गुंततं - कारण ती अनामिकांची संघर्षगाथा आहे!
आता शेवटाकडे येताना... प्रत्येक कालखंडात नवनवीन आव्हानं निर्माण होत असतात आणि ती स्वीकारायला तरूण पिढीतून काही जण पुढेही येतात. कधी आधीच्या पिढीतल्या कार्यकर्त्यांच्या पावलावर पाऊल टाकून तर कधी नवे मार्ग शोधत तीही आपला संघर्ष चालू ठेवतात. ह्या वाटचालीत काही समस्या सुटतात, काही नव्याने निर्माण होतात, काही अनुत्तरित राहतात; काही आशेचे क्षण येतात, कदाचित त्याहूनही जास्त निराशेचे येतात...पण म्हणून संघर्ष मात्र थांबत नाही! आजच्या पिढीतल्या समाजसुधारणेच्या ध्येयानी प्रेरलेल्या सगळ्या तरूण-तरूणींसाठी ही संघर्षगाथा नक्कीच प्रेरणादायी ठरते; त्या पात्रांमध्ये नकळत आपण स्वत:ला बघू लागतो आणि त्यांचा संघर्ष आपल्या आजच्या संघर्षासोबत हळूच मिसळून जातो! आणि माझ्या मते,आजच्या पिढीलाही ही आपलीच कहाणी वाटावी, हेच ग.प्रं चं सर्वात मोट्ठं यश आहे!
छान पुस्तकपरिचय.
ReplyDeleteविचारसरणी भिन्न असली तरी कोणी कोणाला देशद्रोही वगैरे म्हणत नाही हे विशेष नोंदवण्यासारखं